पंचवटी : शहरात लॉकडाऊन लागू असतानाही पंचवटीत सर्रासपणे देशी- विदेशी अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने गुरुवारी (दि.१३) रात्री जुना आडगाव नाक्यावरील पंचवटी बस डेपोसमोर रात्री सापळा रचून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे देशी- विदेशी मद्य व एक मारुती ओमनी कार असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकणी पोलिसांनी बेकायदा मद्य विक्री करणाऱ्या ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पंचवटी बस डेपोसमोर एका ओमनीत काही जण लॉकडाऊनचा गैरफायदा घेत विनापरवाना मद्य विक्री करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना मिळाली होती. त्या आधारे पोलीस निरीक्षक अशोक साखरे, सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, रवी आढाव, दिलीप बोंबले, सागर कुलकर्णी, नारायण गवळी, कल्पेश जाधव, अंबादास केदार, घनश्याम महाले आदींनी बस डेपोसमोर कारवाई केली. त्यावेळी चव्हाण बॅटरीजवळ वाहनांच्या आडोशाला एका व्हॅनमध्ये (एम एच- १५ के- ८०३८) संशयित मयूर साहेबराव बोधक, (मखमलाबाद), कपिल रोहिदास पगारे (अवधूतवाडी, फुलेनगर), दीपक बाळू पोद्दार (स्वामी नारायण मंदिर ट्रस्ट खोली), प्रीतम राजेंद्र चव्हाण (गंगापूर रोड), रोहन सुरेश शिंदेे (भद्रकाली), आदी भरलेल्या बॉक्समधून देशी- विदेशी मद्याची अवैधरीत्या विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर केलेल्या कारवाईत पोलिसांनी देशी दारूचे ४० बॉक्स, विदेशी दारूचे १४ बॉक्स त्यांच्या ताब्यातील ४५ हजार रुपये किमतीची ओमनी व्हॅन असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संशयितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.