नाशिक- येत्या ८ जानेवारीस देशभरात होत असलेल्या संपातनाशिक महापालिकेतील विविध कर्मचारी संघटना सहभागी होणार असून त्यासंदर्भात कर्मचारी संघटनेच्या वतीने आज महापालिका आयुक्तांना संपाची नोटिस बजावण्यात आली आहे.
नाशिक महापालिका कर्मचारी कामगार कृती समितीच्या वतीने प्रविण तिदमे, डॉ. डी. एल. कराड, गजानन शेलार, गुरूमित बग्गा, सुरेश दलोड, सुरेश मारू, संदीप भंवर, प्रकाश अहिरे यांच्यासह अन्य संघटना प्रतिनिधींनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना संपाची नोटिस दिली.
नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत संघटनांनी यापूर्वी देखील प्रशासनाला पत्रे देऊन चर्चा केली आहे. मात्र, निर्णय होत नाही. त्यामुळे संपावर जात असल्याचे यात नमुद करण्यात आले आहे. महापालिकेत सर्व रिक्तपदे भरल्यानंतरच सेल्फी आणि बायोमेट्रीक हजेरीची कार्यवाही सुरू करावी, आऊटसोर्सिंगचा ठेका रद्द करावा, आरोग्य विभागातील रिक्तपदे मानधनावर भरावी, महासभेने केलेल्या ठरावानुसार आणि वेतन संरचनेनुसारच सातवा वेतन आयोग लागू करावा, महापालिकेच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पदोन्नती द्यावी अशा अनेक मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे.