लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (दहावी) अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेला मंगळवारपासून (दि. १८) सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक विभागातून सुमारे पाच हजार ५५० विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर दिला. किरकोळ अपवाद वगळता सर्व परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा शांततेत पार पडल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयाने दिली. नाशिक विभागातून एकूण १२ हजार ५५३ विद्यार्थी पुरवणी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. यापैकी नाशिक विभागातून सात हजार ३२५, धुळ्यातून १०२७, जळगावमधून २९२९ व नंदुरबारमधून १२२९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार वेगवेगळ्या विषयांचे पेपर देणार असून, मंगळवारी विभागातून मराठीच्या साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर दिला. विभागीय शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार विभागातील नाशिकसह, धुळे, नंदुरबार व जळगावमधील सर्व परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर अपवाद वगळता शांततेत पार पडला आहे.
साडेपाच हजार विद्यार्थ्यांनी दिला मराठीचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:03 AM