देवळाली कॅम्प : लष्कर भरतीच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील पाच हजार युवकांनी हजेरी लावली. सोमवारी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने मध्यरात्रीपासूनच प्रक्रिया सुरू केल्याने गोंधळ टळण्यास मदत झाली. भरतीच्या पहिल्या दिवशी रविवारी नाशिक जिल्ह्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात युवक आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. परिणामी जळगाव व धुळे जिल्ह्यातील युवकांची भरती मंगळवारी पहाटे तीन वाजेपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नाशिक जिल्हातील युवकांकरिता भरतीप्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी सोमवारी रात्री बारा वाजेपासूनच आनंदरोड मैदानावर युवकांनी गर्दी केली होती. गोंधळ उडू नये म्हणून लष्कराच्या अधिकाऱ्यांनीही टप्प्याटप्प्याने भरतीप्रक्रिया सुरू करत शारीरिक चाचणी पहाटे तीनपासून सुरू करण्यात आली. पहाटे ५ वाजेच्या सुमारास येथील आनंदरोड मैदानावर विविध तालुकावार विभागणी करत युवकांना आत सोडण्यात आले. अगोदर धुळे व जळगाव जिल्हातील उर्वरित उमेदवारांना संधी देण्यात आल्यानंतर नाशिक जिल्हाभरातील उमेदवारांना सोडण्यात आले. प्रत्यक्ष भरती प्रक्रियेस सुरुवात करून मैदानी चाचणी व उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासणी करण्यात आली. यात फिट बसलेल्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी थांबविण्यात आले तर अनफिट झालेल्यांना तत्काळ बाहेर काढून देण्यात आले. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील युवकांची भरतीसाठी गर्दी कमी दिसून आली. त्यामुळे सकाळी अकरापर्यंत आनंदरोड मैदान, सह्याद्रीनगर मैदान रिकामे झाले होते.खाकीतील माणुसकीमुख्य भरतीप्रक्रिया मैदानापासून बाहेर पडणाºया उमेदवारांची सोय व्हावी या हेतूने आयुक्तालय व देवळाली कॅम्प पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने माणुसकीच्या भावनेतून भरतीतून बाद होणाºया उमेदवारांना खंडेराव टेकडी ते नाशिकरोडपर्यंत सोडण्यासाठी दोन वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती.युवकांचा जन्म दाखला, शैक्षणिक दाखला व कागदपत्रे, क्रीडा, रहिवासी दाखला, विवाहित अथवा अविवाहित असल्याचा पुरावा, ६ महिन्यांपर्यंतचा चारित्र्य दाखला, जातीचा दाखले, प्रतिज्ञापत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, प्रतिज्ञापत्र यांसह सर्व शैक्षणिक पात्रता असलेले मार्कशीट, शाळा व महाविद्यालयीन काळामधील खेळात मिळवलेली प्रमाणपत्रे, सर्व मूळ प्रमाणपत्रे आदींसह सेवारत, माजी सैनिक, शहीद जवान व वीरपत्नी यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली.
लष्कर भरतीसाठी पाच हजार युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:26 PM