ओझरस्थित हिंदुस्थान ऐरोनॅटिक लिमिटेड ही भारत सरकारची लढाऊ विमान तयार करणारी अग्रणी कंपनी असून, कंपनी कायद्यात त्या संस्थेस होणाऱ्या नफ्यातून काही रक्कम सार्वजनिक हितासाठी राखीव ठेवून त्याचा विनियोग सार्वजनिक हितासाठी करणे बंधनकारक केले आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार ग्रामीण भागातील जनतेस अत्यावश्यक रुग्णसेवा तत्काळ उपलब्ध होण्यासाठी कंपनीच्या सामाजिक बांधीलकी उपक्रमातील राखीव निधीतून अद्ययावत पाच कार्डियक रुग्णवाहिका खरेदी करून देण्याची मागणी हिंदुस्थान ऐरोनॅटिक कंपनीच्या व्यवस्थापनाकडे केली होती. त्यानुसार हिंदुस्थान ऐरोनॅटिक लिमिटेड कंपनीने वोक्स वॅगन कंपनीच्या पाच अद्ययावत कार्डियक रुग्णवाहिका खरेदी करून नाशिक जिल्हा परिषदेस सुपूर्द केल्या आहेत.
प्राप्त झालेल्या अद्ययावत रुग्णवाहिका या निफाड तालुक्यातील खडक माळेगाव, पिंपळगाव व नैताळे प्राथमिक आरोग्य केंद्र, दिंडोरी तालुक्यातील मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, चांदवड तालुक्यातील वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वितरित करण्यात आल्या आहेत. हिंदुस्थान ऐरोनॅटिक लिमिटेड यांच्याकडून प्राप्त अद्ययावत रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल अहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे उपस्थित होते.
(फोटो १० ॲम्बुलन्स)