नाशिक : जन्मदात्या आईनेच लोखंडी सळईने आपल्या पाच वर्षीय चिमुकलीची मांडी, पोटरी व पायावर चटके देऊन दुखापत केल्याची तक्रार या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे़ गंगापूररोड परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीची आई व तिच्या साथिदाराविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, हा गुन्हा तपासासाठी गंगापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एऩ जे़ कंडारे यांनी दिली.
विजय रामचंद्र डिंगोरे (३४, रा़ मोखाडा, जि़ पालघर) यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची पाच वर्षांची मुलगी संस्कृतीला तिची आई अनिता विजय डिंगोरे व हरी बाबू गायकवाड यांनी १२ व १३ सप्टेंबर २०१८ रोजी गंगापूररोड परिसरातील एका दुमजली घरात नेऊन तिच्या डाव्या पायाची मांडी, पोटरी व पायावर लोखंडी सळई गरम करून चटके दिले व दुखापत केली़
या प्रकरणी मुलीची आई अनिता डिंगोरे व हरी गायकवाड या दोघांवर मोखाडा पोलीस ठाण्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी तो गंगापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे़