नाशिक- गेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर जिल्ह्याला कॅबीनेट मंत्रीपद मिळाले नव्हते. मात्र आता छगन भुजबळ यांच्या रूपाने पाच वर्षानंतर पुन्हा भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार देखील त्यांनाच दिला जाण्याची शक्यता आहे.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर ज्या मोजक्या नेत्यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली, त्यात भुजबळ यांचा देखील समावेश आहे. जय महाराष्ट्र व जय शिवराय म्हणत भुजबळ यांनी शपथ घेतली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांनी शपथेच्या प्रारंभी आदराने उल्लेख केला. जय ज्योती जय क्रांतीने त्यांनी शपथेचा समारोप केला. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना, राष्टÑवादी आणि कॉँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मोजक्याच नेत्यांना मंत्रीपदी संधी मिळणार होती अर्थातच भुजबळ हे राज्यातील हेवीवेट नेते असल्याने त्यांना संधी मिळणे क्रमप्राप्त होते.त्यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला मंत्रीमंडळात प्राधान्य मिळाले आहे.
२००९ मध्ये भुजबळ यांनी प्रथम नाशिक जिल्ह्यातील येवला मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्यानंतर येवला मतदार संघातून ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणूकीत ते निवडून आले असले तरी युतीचे सरकार असल्यामुळे मंत्रीपदापासून ते दूर होते. आता पुन्हा ते मंत्रीमंडळात परतून आल्याने यंदा देखील त्यांना महत्वाच्या खात्यासह नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.यापुढिल मंत्रीमंडळ विस्तारात जिल्ह्यातून आणखी एक मंत्रीपद दादा भुसे यांना मिळण्याची शक्यता आहे. भुसे हे गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत राज्यमंत्री होते. आता शिवसेनेची सत्ता आल्याने पुन्हा त्यांना संधी मिळणे शक्य आहे. ते चौथ्यांदा निवडून गेले आहेत.