मागील पाच वर्षांचा आढावा घेतल्यास खरीप हंगामातील भात, बाजरी, ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन, तीळ, रागी, आदी पिकांच्या दरात दरवर्षी सातत्याने कमी अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. २०१६-१७ च्या खरीप हंगामात भाताला १४७० रुपये प्रति क्विंटल, तर २०२०-२१ मध्ये हाच दर १८६८ रुपये इतका करण्यात आला आहे. पाच वर्षांत भाताच्या दरात ३९८ रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, केवळ हमीभाव वाढवून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही, तर खुल्या बाजारातही या किमतीपेक्षा कमी दराने माल घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. हमीभाव केवळ शासकीय खरेदी केंद्रांवरच दिला जात असल्याने सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. याबाबत शासनाने उपाय योजना करण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
चौकट-
मागील पाच वर्षांत प्रमुख पिकांच्या दरात झालेली वाढ
भात -३९८ , हायब्रीड ज्वारी - ९९५, बाजरी - ८२०, मका -४८५, सोयाबीन -११०५ , कापूस -१६५५
चौकट-
महागाईचा वाढता आलेख पाहता पिकांच्या हमीदरात शासनाने वाढ केली असली तर खते, बियाणे, मशागत, मजुरी या सर्वांचे दर वाढल्याने पिकांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे दर वाढूनही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही पडत नाही. त्यातच खुल्या बाजारात हंगामाच्या काळात हमीभावापेक्षाही कमी दराने खरेदी केली जात असते. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.