सिन्नर : बारागावपिंप्रीसह सात गावांची योजना एक महिना सुरळीत चालली तरच ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात येईल. अन्यथा या योजनेची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्र देण्यात येईल, अशा इशारा आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदाराला दिला.
बारागावपिंप्रीसह पाटपिंप्री, सुळेवाडी, निमगाव सिन्नर, गुळवंच, हिवरगाव, केपानगर आदी गावाचा या योजनेत समावेश आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत या सात गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. मात्र योजनेच्या कामात अद्यापही त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासंदर्भात कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता मोरे, उपअभियंता पाटील, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, वीज वितरणचे उपअभियंता तसेच संबंधित गावांतील सरपंच व ग्रामसेवक आणि पाणीपुरवठा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
योजनेत समाविष्ट गावांतील सरपंच व ग्रामसेवकांनी मांडलेल्या मागणीप्रमाणे योजनेतील त्रुटी दूर कराव्यात. प्रत्येक गावात किती पाणी दिले जाते याचा हिशोब ठेवावा, प्रत्येक गावासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकावी, पंपिंग हाऊस चोवीस तास कार्यान्वित करण्यात यावे, अशा सूचनाही कोकाटे यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
दरम्यान, ग्रामपंचायतींना योजनेचे वीजबिल परवडत नसल्याची तक्रार ग्रामसेवक व सरपंच यांनी केली. त्यावर संबंधित ठेकेदाराला अदा केलेल्या बिलाची वसुली करून त्यातून थकलेले वीजबिल भरण्याची शिफारस केली. योजनेची जलवाहिनी टाकताना ठेकेदाराने खोल चारी घेतलेली नसल्याने ठिकठिकाणी शेतात नांगरणी सुरू असताना जलवाहिनी फाळाला लागत असल्याच्या तक्रारीही होत आहे.
----------------------------
योजनेत त्रुटी
कोट्यवधी रुपये निधी मंजूर झाला मात्र मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा योजना व्यवस्थित डिझाइन केली नसल्याचा आरोप आमदार कोकाटे यांनी केला. योजनेतील त्रुटी दूर करून योजना सुरळीत करीत नसेल तर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. तसेच याप्रश्नी तातडीने तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील तसेच मजीप्राचे मुख्य अभियंता यांच्या दालनात लवकरच बैठक घेण्याचा निर्णय कोकाटे यांनी घेतला.