गेल्या वर्षीच मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, लवकरच या ग्रामपंचायतींचा कारभार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात येणार आहे. तत्पूर्वी गाव पातळीवरील विकासकामे रखडू नयेत म्हणून गेल्यावर्षी जुलै महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. अद्यापही हे प्रशासक ग्रामपंचायतींवर कायम आहेत. दरम्यान, नुकत्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्याने प्रजासत्ताक दिनी होणारे ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होणार याविषयी उत्सुकता असली तरी, अजूनही निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची निवड झालेली नाही. येत्या २८ जानेवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येऊन त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची सरपंच निवडीसाठी बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सरपंचाची निवड केली जाईल व त्यानंतर सदस्यांचे सदस्यत्व गृहीत धरले जाणार अहे. ही सारी प्रक्रिया प्रजासत्ताक दिनानंतरच पार पाडली जाणार असल्याने तूर्त ग्रामपंचायतींच्या प्रशासकांनाच ध्वजारोहण करण्याचा मान कायम राहणार आहे.
ध्वजारोहणाची दोरी प्रशासकांच्या हातीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:14 AM