ओझर टाऊनशिप : जगद्गुरू जनार्दनस्वामी महाराज यांच्या ३१व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी दि. १९ ते २६ डिसेंबर या काळात होणाऱ्या विश्वशांती धर्मसोहळ्याचे ध्वजारोहण ओझर येथील बाणेश्वर महादेव आश्रमात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
खासदार डॉ.भारती पवार, भाजप नेते सुनील बागुल, भागवतबाबा बोरस्ते, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, निफाड पंचायत समितीच्या सभापती रत्ना संगमनेरे आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते मुख्य धर्मध्वजासह जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, महिला जप, हस्तलिखित नामजप, नामसंकीर्तनआदी सात धर्मध्वजांचे ध्वजारोहण झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ध्वजारोहण सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. प्रारंभी आश्रम परिसरात पालखी मिरवणूक, सद्गुरुंच्या पादुकांचे पूजन, पालखीपूजन झाले.
भाविकांना मार्गदर्शन करताना शांतिगिरी महाराज म्हणाले, जनार्दनस्वामींसारखे महान सद्गुरु आपणा सर्वांना लाभले हे मोठे भाग्य असून, त्यांच्या चरणांची सेवा, त्यांच्या कार्यात सहभागी होण्याची तळमळ हाच खरा भक्तिमार्ग आहे. भाविकांनी सद्गुरु कार्यात सेवा मागून घ्यावी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही दुजा, पाहता त्रैलोकी हे वाक्य नेहमी स्मरणात ठेवा. गुरुसेवा निष्काम भावनेतून करा. आपल्या मनाला चांगल्या सवयी लावा. चित्त शुद्ध ठेवा असे त्यांनी सांगितले.
आश्रमाच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वरसिंधुराचे संचालक राहुल शिंदे यांनी भक्तिगीते सादर केली. ‘ओम जनार्दनाय नमः’ या महामंत्राचा जप यावेळी करण्यात आला.