लोकमत न्युज नेटवर्कएकलहरे: येथुन जवळच असलेल्या हिंगणवेढा शिवारात बिबट्याची मादी आपल्या बछड्यांसह ठाण मांडुन असून, या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ‘लोकमत’ मधील बातमीची दखल घेऊन वन विभागातर्फे पिंजराही लावण्यात आला. मात्र पिंज-यातील सावजापर्यंत बिबट्या येऊन जातो, मात्र पिंज-यात शिरत नसल्याचे आढळून आले असून, शेजारी असलेल्या गव्हाच्या शेतात बिबट्याचे ठसे स्पष्टपणे दिसू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट कायम आहे.एकलहरे- हिंगणवेढा शिवरस्त्यावर साहेबराव धात्रक, यमाजी नागरे, पवळे यांच्यासह १५ ते २० कुटुंबांची वस्ती मळ्यांमध्ये अदूप, या रस्त्याच्या दोन्हीही बाजुला पक्की घरे, जनावरांचे गोठे, कांद्याच्या चाळी, शेडनेट उभालेले आहेत. दोन, तीन ठिकाणी उस उभा आहे. या उसांमध्येच बिबट्या व त्याच्या बछड्यांचे वास्तव्य आहे. अनेक शेतकरी महिलांनाही त्यांचे दर्शन झाले आहे. तसेच त्याने काही कुत्र्यांवर हल्ले केल्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी सध्या पवळे यांच्या उसाच्या शेतात पिंजरा लावण्यात आला आहे. या पिंज-यात रोज रात्री सावज म्हणुन बकरी ठेवली जाते. बिबट्या त्या वासाने रात्री केव्हातरी पिंज-या पर्यंत येतो. मात्र पिंज-यातील सावजापर्यंत जात नाही. पिंंज-याच्या शेजारीच गव्हाचे शेत असून, त्या शेतातुन पिंज-यापर्यंत बिबट्या आल्याचे त्याच्या पावलांच्या ठशांवरून स्पष्ट दिसत आहे. पिंज-याजवळुन बिबट्या पुन्हा दुस-या उसात निघुन जात असून, मधुनच दिवसाढवळ्या बछड्यासह त्याचे दर्शन होत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. पिंजरा लावूनही बिबट्या हुलकावणी देत असल्याने बिबट्याच्या वास्तव्याच्या भितीने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, दिवसा देखील एकटे दुकटे जाण्याचे धाडस टाळले जात आहे.
बिबट्याची पिंजऱ्याला हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 3:31 PM