पंचवटी : गंगाघाटावर विविध व्यवसाय करणाऱ्या शेकडो व्यावसायिकांचे सारे काही गोदामाईने गिळंकृत केल्याने व्यावसायिकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला आहे. पुराच्या पाण्याने होत्याचे नव्हते केल्याने उदरनिर्वाह पुरात वाहून गेला. आता कसे सावरायचे, हे संकटच व्यावसायिकांवर कोसळले आहे. ४मंगळवारी रात्री आलेल्या पुरामुळे तेलही गेले अन तूपही गेले अशीच काहीशी परिस्थिती व्यावसायिकांची झाली असून सध्या तरी उद्ध्वस्त झालेल्या दुकानांसमोर एकटक उभे राहून आता पुन्हा कसे सारे उभे करायचे याचीच चिंता व्यावसायिकांना भेडसावत आहे. गंगाघाट परिसरात असलेले हॉटेल, पानटपऱ्या, फुलविक्रेते, पूजा साहित्य विक्रीची दुकाने, रसपानगृह, चहाच्या टपऱ्या, बॅग विक्रेते, कापड दुकाने, खाणावळ अशा शेकडो व्यावसायिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले. सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीला पूर येणार, अशी धास्ती मनात बाळगणाऱ्यांनी सुरक्षितता म्हणून आपापली दुकाने खाली करून त्यातील वस्तू सुरक्षितस्थळी नेण्याचे काम केले. मात्र पुरामुळे दुकाने खाली करण्यास तसेच वस्तू सुरक्षितस्थळी हलविता न आलेल्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. ४खाणावळचा व्यवसाय असलेल्या महेश गोवर्धने यांची सांडव्यावरची देवी मंदिरासमोर रमेश खाणावळ होती. पुरामुळे ४० बाय ३० चे सव्वाशे पत्रे असलेले शेड तर गेलेच शिवाय पाण्यात गॅसशेगडी, सिलिंडर, स्वयंपाकाची भांडी, पाण्याची टाकी असे सारे काही वाहून गेले. या खाणावळला लागूनच विलास पवार यांचे समाधान रसपानगृह होते. मात्र आता त्याठिकाणी केवळ मोकळी जागा शिल्लक आहे. दुकानातील विद्युत रोहित्र, रसवंतीचे यंत्र हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर सरदार चौकातील वनारसीभाई पटेल यांच्या किराणा दुकानात पुराचे पाणी शिरल्याने गहू, तांदूळ, साखर व अन्य किराणा माल पूर्णपणे खराब झाला. जवळच असलेल्या अजय तांबोळी यांच्या तांबोळी पान दुकानाचे मोठे नुकसान झाले. ४सरदार चौकातील पाटील टी हाऊस या दुकानात पाणी तर शिरलेच शिवाय पाटील यांचे घरही त्याचठिकाणी असल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सरदार पोलीस चौकीजवळ असलेल्या ठाकूर खेळणी व्यावसायिकाचे लाकडी खेळण्यांचे दुकान असून, दुकानातील माल भिजल्याने नुकसान झाले. तर रामकुंडावर हेमंत गोवर्धने यांचे कपालेश्वर फूड दुकान असून दुकानातील फ्रीज व अन्य वस्तू पाण्याने खराब झाल्या.
पुरात वाहून गेला ‘उदरनिर्वाह’
By admin | Published: August 05, 2016 1:25 AM