कळवण : पुनंद प्रकल्पातून जाणाऱ्या सटाणा नगरपरिषदेच्या जलवाहिनी योजनेला लोकप्रतिनिधी या नात्याने आपला पहिल्यापासून विरोध असून कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व शेतकऱ्यांचा विरोध देखील दिवसेदिवस वाढत चालला आहे . जनतेचा विरोध लक्षात घेऊन सरकारने काम थांबवावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृती समितीबरोबर भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती करणार असल्याचे आमदार जे.पी. गावित यांनी सांगितले.न्यायालयाच्या आदेशानंतर पुनंद योजनेचे काम सुरू झाल्याने पाणीप्रश्न पेटला असून कळवण व देवळा तालुक्यातील शेतक-यांनी धरणे आंदोलन करत योजनेला विरोध दर्शविला आहे. या धरणे आंदोलनातच आमदार जे. पी. गावित यांनी आपली भूमिका स्पष्ट करून योजनेला विरोध दर्शविला असून विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असून दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन योजनेचे काम बंद करून सटाणा शहराला आरक्षित केलेले पाणी कालव्याद्वारे किंवा नदीद्वारे द्यावे अशी मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. गावित यांनी सांगितले, पुनंद पाणी पुरवठा योजनेचे काम न्यायप्रविष्ट असल्याने कळवण तालुक्यातील जनतेने या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेतून प्रश्न मार्गी लागला नाही तर कळवण व सुरगाणा तालुक्यातील २० हजार जनतेचे आंदोलन उभे करून सरकारवर दबाव आणून काम बंद करुन दाखवू शकतो, असा इशाराही गावित यांनी दिला आहे.
पुनंद पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 5:11 PM
जे.पी. गावित : पाणीपुरवठा योजनेला विरोध
ठळक मुद्दे२० हजार जनतेचे आंदोलन उभे करून सरकारवर दबाव आणून काम बंद करुन दाखवू