;मनोज देवरे,
कळवण (नाशिक) - कळवण तालुक्यातील आदीवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून चणकापूर व पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चणकापूरमधून 34 हजार क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनंदमधून 14 हजार क्यूसेस पाणी पुंनंद नदीपात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील पुनंद ,गिरणा,बेहडी व तांबडी नद्यांना तसेच म्हशाड नाला खळखळून वाहत आहे. नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना या पूरपाण्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असून १५-२० गावांचा पाड्यांचा संपर्क तुटला असून प्रशासनाने नदीकाढावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .
सप्तश्रुंग गडावर सातत्याने पावसाची रिपरिप सुरु असल्यामुळे मार्केडपिंप्री व नांदुरी लघुपाटबंधारे प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. आठंबे फरशी पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे कळवण - नाशिक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली असल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे.नाशिककडे जाणारी वाहने अभोणा मार्गाने मार्गस्थ झाली.गणेश खेडगाव गावाजवळील पुनंद नदी पूलावरून पाणी वाहत असल्यामुळे ककाणे,बिजोरे, विसापुर गागवण या गावाचा संपर्क तुटला आहे.