नाशिक (सुयोग जोशी) : महापालिकेतील प्रशासकीय राजवटीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ऑनलाइन तक्रारींकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेले एनएमसी ई-कनेक्ट ॲप्लिकेशनसह टपालाद्वारे प्रशासनासमोर तक्रारींचा पाऊस पडला आहे. सद्य:स्थितीत महापालिकेकडे १५१३ तक्रारी प्रलंबित आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तक्रारींचा ओघ बघता त्यांचे निराकरण करण्याची मोठी कसरत महापालिकेच्या ४७ विभागांना करावी लागणार आहे.
विशेष म्हणजे या तक्रारी हेल्पलाइन, विभागीय कार्यालये, मोबाइल ॲपसह वेब पोर्टलवरून आल्या आहेत. ‘सरकार आपल्या दारी’ असे म्हणत शासन एकीकडे गतिमान कारभाराचे दाखले देत असताना, नाशिक महापालिका मात्र ‘गतिहीन’ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एनएमसी ई कनेक्ट ॲपवर नागरिकांनी तक्रारी करूनही त्याकडे अधिकाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहेत. एनएमसी ई-कनेक्ट ॲप्लिकेशन विकसित केले असून, त्यावर तक्रार दाखल झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत विभागप्रमुखांना तक्रार पाहणे बंधनकारक आहे. दखल न घेतल्यास स्वयंचलित पद्धतीने कारणे दाखवा नोटीस पोचत असल्याने त्याचा धसका अधिकाऱ्यांनी घेतला आहे, मात्र प्रत्यक्षात याबाबत कोणतीही कार्यवाही दिसून येत नसल्याचे सध्याच्या तक्रारींवरून दिसून येत आहे.------------अशा आहेत तक्रारीघनकचरा : ५१४अतिक्रमण : १८०मलनिस्सारण : १४३बांधकाम विभाग : १२१पाणीपुरवठा :११२उद्यान : ९५नगररचना : ७५पशुसंवर्धन : ६५विद्युत : ५९पेस्ट कंट्रोल : ३१जन्म-मृत्यू : २२इतर : ९६एकूण : १५१३