कळवण : देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी पहिला लॉकडाउन जाहीर केला आणि सर्वांनाच आहे तिथेच थांबण्याची सूचना केल्यानंतर उदरनिर्वाहासाठी शेकडो किलोमीटर दूरवरून आपल्या कुटुंबीयांसह आलेल्या परजिल्ह्यातील मजुरांना अडकून पडावे लागले होते. मात्र, कळवण येथील नगरपंचायत प्रशासनाने मजुरांच्या अडचणी जाणून घेत त्यांना त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था केल्याने या कोमेजलेल्या या मजुरांच्या चेहºयावर हास्य फुलले.कळवण येथे रस्त्याच्या कामासाठी हिंगोली, गोंदिया, धुळे या जिल्ह्यातील २४ कुटुंब असलेले ५६ मजूर गेल्या तीन महिन्यांपासून आलेले होते, परंतु भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली आणि हे सारे मजूर आपल्या कुटुंबीयांसह अडकले. त्यानंतर लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला. लॉकडाउनमुळे सर्व कामे बंद ठेवण्यात आल्याने या मजुरांच्या राहण्याचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.कळवण नगरपंचायतीने जुन्या पंचायत समिती आवारात या मजुरांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली होती. गेल्या दोन महिन्यांपासून हे मजूर या ठिकाणी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. परजिल्ह्यासह परराज्यात जाण्यास बंदी असल्याने या मजुरांना येथेच अडकून पडावे लागले होते. नुकतीच शासनाने काही अंशी नियमात शिथिलता देत अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या गावी परतण्याची मुभा दिली होती.या मजुरांकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांची अडचण वाढलेली असतानाच कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांच्या प्रयत्नातून या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. टेम्पो ट्रॅव्हलर गाडीतून हिंगोली, गोंदिया व धुळे जिल्ह्यातील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यातआले.दोन महिन्यांच्या कालावधीनंतर घरी परतता येत असल्याने मजुरांनी आनंद व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले.--------------------------------------मजुरांची पालकाप्रमाणे काळजीरस्त्याच्या कामासाठी आलेल्या या मजुरांच्या २४ कुटुंबात बाया-बापड्यांसह त्यांची चिमुकली मुलेही होती. हाती पैसा नाही, खायला अन्न नाही अशा परिस्थितीत लॉकडाउन जाहीर झाल्याने या कुटुंबीयांसमोर उदरभरणाचा यक्षप्रश्न निर्माण झालेला असताना नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी राहण्याची व्यवस्था करून देत विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून त्यांना अन्नधान्य, किराणा वस्तू उपलब्ध करून दिल्या. त्यांची पालकाप्रमाणे काळजी घेतल्याचे मजुरांनी सांगितले. गुरु वारी हिंगोली येथील मजुरांना रवाना करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, कर्मचारी योगेश पगार आदी उपस्थित होते.---------------------------दोन महिने झाले, घराकडे जाण्याची ओढ लागली होती, मात्र लॉकडाउन असल्याने जाता येत नव्हते. या कालावधीत नगरपंचायत प्रशासन व दानशूर व्यक्तींनी खूप मदत केली. घराकडे जात असल्याने आनंद वाटतो आहे.- नारायण गोरणर, मजूर, हिंगोलीदोन महिन्यांपासून अडकून पडलेल्या मजुरांना वेळोवेळी शिधा व किराणा उपलब्ध करून दिला. या मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी खासगी वाहन उपलब्ध करून देऊन हिंगोली, धुळे व गोंदिया येथे रवाना केले आहे.- डॉ. सचिन माने, मुख्याधिकारी,कळवण नगरपंचायत
कोमेजलेल्या चेहऱ्यांवर फुलले हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 9:17 PM