नाशिक : गुलशनाबाद अर्थात फुलांचे शहर अशी नाशिकची जुनी ओळख. अल्हाददायक पोषक वातावरण लाभलेल्या या शहरात विविध भारतीय प्रजातीची फुले फुलतात; मात्र विदेशी प्रजातीच्या फुलांनाही येथील हवामान चांगलेच मानवते, याचा प्रत्यय नासिक्लबच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवात आला. हजारो फुलांच्या ताटवे न्याहाळताना नाशिककर या अद्भूत दुनियेत रमले.पुणे महामार्गावर नंदीनीच्या काठालगत वसलेल्या ‘नासिक्लब’च्या हिरवळीवर बुधवारी (दि.२४) संध्याकाळी ‘फ्लॉवर्स-शो २०१८’ या प्रदर्शनाचे उद्घाटन गणेश पूजनाने करण्यात आले. यावेळी ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा, नासिक्लबचे संचालक रामेश्वर सारडा, विक्रम सारडा, ज्येष्ठ वास्तुविशारद अरुण काबरे, पुष्परचनाकार हिमानी जेठवा, अॅड. नंदकिशोर भुतडा आदि मान्यवर उपस्थित होते.
पिवळ्या झेंडूसह ‘क्रिस्पा’ हा वेगळा प्रकारही झेंडूचा या पुष्पोत्सवात बघता येऊ शकतो. गुरूवारी (दि.२५) या पुष्पोत्सवात शहरातील आठ शाळांचे विद्यार्थी हजेरी लावणार असून हा दिवस शाळकरी मुलांसाठी राखीव असल्याचे संयोजकांनी सांगितले.
विदेशी फुलांचा खजिनाएकूणच पुष्पप्रेमींना विविधरंगी फुलांच्या वेगवेगळ्या प्रजाती या प्रदर्शनात न्याहाळण्यास मिळणार आहे. भारतीय प्रजातीसह विदेशी प्रजातीची ब्राझीलियन बटरफ्लाय, प्रीन्स फुल, ऐडिनियम, त्याचप्रमाणे कॅलेठ्यूला, तोरेनिया, बालसम, साल्विया, इंप्रेशन्स, असिलम, लिलियम, ट्यूलिप, ग्लॅडियस, बेगोनिया, आफ्रिकन गुलाब, जिरेनियम, डायनथस, ओरनामेंटल केल, पेन्सी, पेटूनिया, डेलिया असे असंख्य प्रकारच्या फुलांचा खजिना येथे रिता झाला आहे.