नाशिक : महामॅरेथॉनमध्ये सुदृढ हजारो नाशिककरांसह असे काही विशेष मुले-मुली धावले, ज्यांची धाव लक्षवेधी तर ठरलीच मात्र डोळस आणि सुदृढ समाजाला प्रेरणाही देऊन गेली. लोकमतच्या वतीने आयोजित नाशिक महामॅरेथॉन मध्ये दृष्टिबाधितांसोबत दिव्यांग, विशेष बालकेही धावली.डोळस समाजाला लाजवेल अशी धाव या दृष्टिबाधितांसह दिव्यांगांनी घेत नाशिककरांचे लक्ष वेधले. ‘हेल्थ इज वेल्थ...’ ‘शिक्षण हा आमचा हक्क आहे..,‘नेत्रदान श्रेष्ठदान’ अशा विविध प्रबोधनपर घोषणांचे फलक झळकावून डोळसांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जिद्द, आत्मविश्वास व धाडस या गुणांचे दर्शन यावेळी या विशेष गटातील आगळ्यावेगळ्या धावपटूंनी उपस्थितांना घडविले. आयुष्य अंधकरमय जरी असले तरी त्यावर जिद्दीने प्रकाशमय मात करत दृष्टिबाधितांनी मदतनिसांच्या आधार घेत धाव घेऊन सुदृढ नागरिकांना प्रेरणा दिली. त्यांची जिद्द, आत्मविश्वास बघून आंतरराष्टÑीय स्तरावर किर्ती गाजविणाºया खेळाडूंनाही त्यांचा हेवा वाटला आणि त्यांनीदेखील या मुलामुलींचे बोट धरून धाव घेणे पसंत केले.
नाशिक महामॅरेथॉनमधील हा एक अद्भूत क्षण होता. हा क्षण उपस्थित नाशिककरांनी आपल्या मोबाईल कॅमेºयात आवर्जून टिपला आणि प्रेरणादायी जिद्दीची धाव सोशल मिडियावरही छायाचित्रांच्या माध्यमातून पोस्ट केली. ज्यांना नियतीने कोणतेही व्यंग दिले नाही असे हजारो नाशिककर आबालवृद्ध नाशिक महामेरेथॉनमध्ये धावले; मात्र यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे दुर्दैवाने नियतीने ज्यांच्या पदरात व्यंग दिले असे काही विशेष मुले-मुलीदेखील महामेरेथॉन मध्ये सहभागी झाले. यामध्ये दृष्टीबाधितांपासून तर दिव्यांगपर्यंत अशा घटकातील मुले मुली यांनी जिद्दीने धाव घेत 'हम भी किसी से काम नहीं' हे दाखवून दिले.