पेठ : कोरोना महामारीच्या दोन्ही लाटांना समर्थपणे सामोरे जात पेठ तालुक्याने अखेर कोरोनापासून मुक्ती मिळवली असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य विभागाने लसीकरण मोहिमेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
मागील वर्षाच्या पहिल्या लाटेत फारशी झळ न बसलेल्या पेठ तालुक्याला दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्येच्या प्रमाणात मृत्यू संख्येने मात्र चांगलेच हादरून टाकले. दोन ते अडीच महिन्यांत जवळपास २२ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. तरीही प्रतिकूल परिस्थिती व अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा सामना करत पेठवासीयांनी आत्मविश्वास व सकारात्मकतेच्या जोरावर कोरोनाला हरवत पुन्हा एकदा जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोनामुक्त होण्याचा मान मिळवला आहे.
आता प्रशासनाने लसीकरणाकडे लक्ष केंद्रित
केले आहे. तहसीलदार संदीप भोसले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र निहाय गावोगावी जाऊन लसीकरण संदर्भात नियोजन व आदेश निर्गमित केले आहेत. पेठ तालुक्यात कोविड लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करुन नागरिकांना लस घेण्यास तयार करण्यासाठी सरकारी अधिकारी व कर्मचारी यांचेवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी गावातील नागरिकांचे प्रबोधन करून लस घेण्याबाबत जनजागृती करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
इन्फो
गावोगावी जाऊन लसीकरण
१८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आल्याने गावातील सुशिक्षित युवकांनी पुढाकार घेत लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला असून आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावात जाऊन लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली.
इन्फो
पेठ तालुका कोरोना अपडेट
एकूण महसुली गावे -१४५
प्राथमिक आरोग्य केंद्र - ७
उपकेंद्र - २९
एकूण बाधित रुग्ण -९४१
नगरपंचायत क्षेत्रातील रुग्ण - २९०
ग्रामीण क्षेत्रातील रुग्ण - ६५१
बरे झालेले रूग्ण - ९१४
एकूण मृत्यू - २७
कोविड सेंटर - २