भोजापूर खोरे परिसराला वरदान ठरलेली म्हाळुंगी नदी कोरडीठाक पडल्याने नदीकाठच्या गावांनाही त्याचा त्रास जाणवू लागला आहे. तालुक्यातील भोजापूर परिसर हा बागायती क्षेत्र म्हणून ओळखले जाते. परिसरात चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी या भागाचा समावेश गावालगतच भोजापूर धरणाची निमिर्ती करण्यात आली आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावरच चारही गावचा पिण्याच्या पाण्याच्या व शेतीचा प्रश्न अवलंबवून आहे. या भागात पावसाचे प्रमाणही चांगल्या प्रमाणात आहे. भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानतंर धरणातून म्हाळुंगी नदीद्वारे विसर्ग सुरू असतो. त्यामुळे या भागात प्रामुख्याने पाणी टंचाई जाणवत नाही. पंरतू अलीकडच्या काळात पावसाचे झालेले कमी प्रमाण, अत्यल्प पाऊस यामुळे बागायती पट्ट्यातही पाणी प्रश्न गंभीर बनवू लागला आहे. गतवर्षी सिन्नर तालुक्यासह सर्वच भागात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळी स्थिती अनुभवयाला मिळत आहे. भोजापूर क्षेत्रात सुध्दा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरून जास्त दिवस न वाहिल्याने सुरूवातीपासूनच नदी कोरडीठाक पडली आहे. भोजापूर परिसरात गेल्या काही वर्षापासून डाळिंब पिकांचे क्षेत्र चांगल्या प्रमाणात वाढले आहे. नळवाडी येथील बहुतांशी शेतक-यांनी टॅँकरने पाणी विकत घेवून डाळिंब बागा जगविल्या होत्या. मात्र गत महिन्यात झालेल्या बेमोसमी गारांच्या पावसाने डाळिंब बागा भुईसपाट झाल्या आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक विंवचनेत सापडला आहे. परिसरातील विहीरींनी तळ गाठला असून गावाच्या पूर्वेकडील बंधारे कोरडेठाक पडले आहेत. जनावरांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. वाड्या वस्त्यांवरील पाण्याची परिस्थिती गंभीर होवू लागली आहे. वाड्या वस्त्यांवर टॅँकरने पाणी पुरवण्याची वेळ आली आहे.
भोजापूर खोऱ्यात चारा, पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 7:01 PM