आडगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी आरक्षण न्यायालयीन प्रक्रिया व घटनात्मक चौकटीत टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि खासदारांनीही पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. तसेच मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे स्वतंत्र प्रवर्गातून असून हे आरक्षण देताना कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात कोणीही भूमिका घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.आडगाव येथील छावा क्रांतिवीर सेनेच्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात शनिवारी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर दुग्धविकासमंत्री अर्जुन खोतकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, अभिजित राणे, सुनील बागुल,नगरसेवक शीतल माळोदे, उद्धव निमसे, शिवाजी सहाणे, मनोरमा पाटील, करण गायकर उपस्थित होते.संभाजीराजे म्हणाले, सर्व बहुजन समाजाने एकसंध राहून काम केले पाहिजे. क्रांती नुसती बोलून घडत नाही तर ती घडवावी लागते त्यासाठी महापुरुषांचा इतिहास जाणला पाहिज़े़ मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाने शांती आणि शिस्तप्रियतेचा आदर्श घालून देत क्रांती घडवून आणल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मराठा समाजाला आरक्षणाच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या युवकांचेही स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी मराठा समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षण व रोजगार पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.राज्य सरकारने घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या तरतुदीत समाजाचा फायदा करून घेत प्रगती साधण्याचे आवाहन दुग्धविकासमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले़जातीपातीच्या राजकारणामुळे समाज मागे पडत आहे. राज्यकर्त्यांकडून स्वार्थासाठी जातींचा धर्माचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र केले जात असला तरी सर्व समाजातील तरुणांनी सजग राहून चिकित्सक वृत्तीने घटनांकडे पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन नरेंद्र पाटील यांनी केले.विविध व्यक्तींचा सन्मानछावा क्रांतिवीर संघटनेतर्फे वारकरी संप्रदायासाठी दिलेल्या योददानासाठी रामकृष्ण महाराज लहवीतकर यांना वारकरी भूषण पुरस्कार व औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गासाठी केलेल्या कार्याचा गौरव करताना सुनील बागुल यांना कामगार रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच उद्धव निमसे यांना ग्रेट मराठा, प्रकाश लोंढे व किशोर घाटे यांना मराठा मित्र, विलास शिंदे यांना कृषिरत्न, राजू देसले यांना सामाजिक, बाळू बोडके यांना क्रीडा रत्न, रुपचंद भागवत व संजय दुसाने याना उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठा आरक्षण टिकविण्यासाठी पाठपुरावा आवश्यक: संभाजीराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 1:24 AM
मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी आरक्षण न्यायालयीन प्रक्रिया व घटनात्मक चौकटीत टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि खासदारांनीही पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे.
ठळक मुद्दे छावा क्रांतिवीर सेनेचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात