लोकमत न्यूज नेटवर्क, धनंजय रिसोडकर, नाशिक : आगामी गणपती उत्सव, नवरात्रोत्सव व दसरा या सणांच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्नपदार्थाबाबत अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून गोपनीय माहितीच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. १५) सकाळी ५ वाजता द्वारका सर्कल येथे गुजरात राज्यातून आलेल्या खाजगी बसेसची तपासणी केली असता त्यातून हा भेसळयुक्त अन्नपदार्थ आणण्यात आल्याचे दिसताच तो साठा जप्त करण्यात आला.
बलदेव ट्रॅव्हल्स आणि श्रीविजय ट्रॅव्हल्स या खाजगी बसमधून अहमदाबाद, गुजरात येथून भेसळयुक्त अन्नपदार्थ आणून रॉयल एक्सप्रेस ट्रॅव्हल्स यांच्या कार्यालयाजवळ उतरवण्यात आले. गुजरात राज्यातून आणलेल्या भेसळयुक्त मिठाईचा वापर हा नाशिक शहरातील मिठाई विक्रेते हे मिठाई, मलाई पेढा, मलाई बर्फी, कलाकंद आदि पदार्थ तयार करण्यासाठी करतात असा संशय अन्न व औषध प्रशासनाला आल्याने व त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुधाचा समावेश नसल्याने याविरूध्द अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहिम राबवून भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे. जप्त केलेले अन्नपदार्थ अनुष्का स्वीट सप्लायर्सचे मालक रविकांत सिंग यांच्याकडून स्पेशल बर्फीची ११ बॅग्ज किंमत रुपये ४१ हजार, मे. डीकलशियन स्वीटसचे मालक श्याम यांच्याकडील ३ बॅग्जची किंमत ११ हजार रूपये तर कन्हैया यांचेकडील ५ खोक्यांची किंमत १७ हजार २९० रूपये याप्रमाणे जप्त केलेल्या भेसळयुक्त मिठाईची एकूण किंमत ६९ हजार २९० रूपये असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.