नाशिक : असे म्हटले जाते, मात्र मानवाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अन्नपदार्थ वाया जाण्याचे प्रमाणही तितकेच वाढलेले दिसून येते. घरातील उरलेल्या अन्नपदार्थांचा सदुपयोग केल्यास भुकेलेल्यांची भूक सहज भागविता येऊ शकते. यासाठी गरज आहे इच्छाशक्तीची. उंटवाडी परिसरातील काही सोसायट्यांमधील रहिवाशांनी एकत्र येत इच्छाशक्ती दाखवून कृतिशील पाऊल उचलले आहे. गो-ग्रास रथापासून तर थेट शहरातील गरजूंपर्यंत अन्न पुरविण्याचा उपक्रम मागील दोन महिन्यांपासून रहिवाशांनी हाती घेतला आहे.घरामधील उरलेले अन्न किंवा हॉटेलमध्ये जेवणाचा बेत आखल्यास शिल्लक राहिलेले अन्न पार्सल घेत वाटेत दिसणाऱ्या गरजूंपर्यंत ते देण्याबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. याबरोबरच घरात आणलेला भाजीपाला निवडल्यानंतर उरलेल्या काड्या, तसेच फळांचे अवशेष, पोळ्या, भात असे सर्व अन्नपदार्थ वेगवेगळे साठवून ते सकाळी नंदिनी गोशाळेच्या गो-ग्रास रथामध्ये रहिवासी देत आहेत. त्यांना सोसायट्यांमधील सुरक्षारक्षकांनी साथ दिली असून, सुरक्षा कक्षामध्ये रहिवाशांनी दिलेले अन्न साठविले जाऊन सकाळी गो-ग्रास रथ येताच त्यांच्याकडे ते ‘खाद्य’ सुपूर्द केले जाते.