नाशिक : दिवाळीच्या काळात घेण्यात आलेल्या सुमारे २०० अन्न नमुन्यांचा अद्यापही अहवाल प्राप्त नसल्याने भेसळ आणि शुद्धतेच्या बाबतीत वराती मागून घोडे असा प्रकार समोर आला आहे. अन्न नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, तेथून प्राप्त होणाºया अहवालानंतर कारवाईची दिशा ठरणार आहे. साधारणपणे महिनाभरानंतर याबाबतचे अहवाल प्राप्त होणार असल्याने दोषी नमुने असलेल्यांवर दिवाळीनंतर कारवाईने नेमके काय निष्पन्न होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणताही सण किंवा धार्मिक सोहळा असला की अन्न सुरक्षा विभागाची जबाबदारी अधिक वाढते. अन्नातून विषबाधा होऊ नये किंवा ते अन्न भेसळमुक्त असावे यावर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित विभागाला करावे लागते. दिवाळीत तर अन्न सुरक्षा विभागाला अधिक दक्ष रहावे लागते. मात्र या काळात करण्यात आलेली कारवाई केवळ प्रयोगशाळेच्या अहवालावरच अवलंबून असल्याने कारवाईचा फार्स कशासाठी? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. खाद्यतेल, वनस्पती तूप, आटा, रवा, खवा, स्पेशल बर्फी यांची संशयावरून तपासणी करण्यात येऊन नमुने ताब्यात घेण्यात आले होते. सदर नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले असून, दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. अद्यापही या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दिवाळीत मिठाई मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. कित्येकदा तयार मिठाई किंवा मिठाई बनविण्यासाठी लागणारा मावा यांची अवैध वाहतूकही केली जाते. अन्न व सुरक्षा विभागाचे या काळात संबंधित विक्रेते आणि कारखान्यांकडे विशेष लक्ष असते. मात्र यंदा अवैध वाहतूक आणि मिठाई बनविणाºया कारखान्यांच्या बाबतीत अन्न सुरक्षा विभागाने गांभीर्याने पाहिले नसल्याचे बोलले जात आहे. गुप्तचर यंत्रणेकडून काही माहिती मिळाल्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने शहरातील काही कारखान्यांवर पहाटेच्या सुमारास कारवाई केली. काही ठिकाणी टाकलेल्या धाडीत आक्षेपार्ह बाबी समोर आल्यानंतरही या कारखान्यांवर अद्याप अपेक्षित कारवाई करण्यात आली नाही, तर प्रयोगशाळेचाही अहवाल नसल्याने नमुने घेऊनही नेमके काय साध्य झाले अशी एकूणच परिस्थिती असल्याने दिवाळीतील मिठाई खाऊन झाल्यानंतर होणारी कारवाई औपचारिकच ठरणारी असल्याची चर्चा होऊ लागली आहे.भेसळीचे प्रमाण कमीचअन्नांमध्ये भेसळीचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे आता भेसळ हा महत्त्वाचा मुद्दा नसून सुरक्षा हाच मुद्दा केंद्रस्थानी आहे. अन्न सुरक्षेविषयी आमच्या विभागाकडून जनजागृती केली जाते. अन्नाचे २२१ नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त नाही. अहवालानंतर कारवाईचे स्वरूप ठरेल. अन्नात कमी दर्जा आढळला तर दंडात्मक कारवाई तर असुरक्षित अन्न तपासणीत समोर आले तर फौजदारी कारवाई होते. दिवाळीत कारखान्यांवर धाड टाकण्यात आलेली नाही.- उदय वंजारी, सहआयुक्त, अन्न सुरक्षा विभाग, नाशिक
अन्न नमुने अद्यापही अहवालाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:30 AM