करंजाळी : दरवर्षी पेठ, सुरगाणासह गुजरात राज्यातून टाळ-मृदुंगाच्या गजरात पताका फडकावत शेकडो दिंड्या पौष वारीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत असताना मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे वारकरी निवृत्तीनाथांच्या भेटीपासून दुरावले असून, याही वर्षी सर्व दिंड्या गावागावांतच होणार असल्याने वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
कोरोनानंतर आता ओमायक्रॉनने डोके वर काढल्याने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील २६ ते २८ जानेवारी दरम्यान सुरू होणारा श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव कोरोनाच्या सावटात अडकला आहे. दरवर्षी त्र्यबंकेश्वरला दिंड्या येतात. यात्रोत्सव म्हटला की दिंडीचालकांना एक महिना अगोदर आपल्या दिंडीचे नियोजन करावे लागते. कुठे मुक्काम तर कुठे दुपारचे भोजन यासंदर्भात पत्रक काढावे लागते. वारकरी अजूनही विवंचनेत आहेत. वारकऱ्यांना दिंडी सोहळ्यात टाळ, पक्वाजांच्या तालावर भजनाचा, फुगडीचा, भारुडाचा, हरिपाठाचा, कीर्तनाचा मनमुराद आनंद लुटावासा वाटतो. याही वर्षी वारकऱ्यांच्या पदरी निराशा पडणार असल्याने भेटीच्या ओढीने वारकरी प्रतीक्षा करीत आहेत.
त्र्यंबकेश्वरमध्ये दिंड्यांना प्रवेश बंदी असल्याने भाविकांनी दिंड्यांचे प्रस्थान मोजक्याच भाविकांना घेऊन स्थानिक मंदिर, देवालय क्षेत्र असेल याच ठिकाणी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून हरिपाठ, प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करावे. दिंड्यांना प्रवेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती व स्थानिक नगरपालिका त्र्यंबकेश्वर, निवृृत्तीनाथ ट्रस्ट त्र्यंबकेश्वर यांनी मज्जाव केला असून, निवृत्तीनाथ प्रशासक ॲड. भाऊसाहेब गंभिरे यांनीही पत्रकाद्वारे कळविले आहे. गुजरात राज्य, सुरगाणा, पेठ, कळवण, त्र्यंबकेश्वर, जव्हार, वाडा, डांग भागातूनही दिंड्या त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी येतात. भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मोजक्या वारकऱ्यांना प्रवेश दिला जाईल या गोष्टीवर विसंबून राहू नये, असे आवाहन पेठ तालुका वारकरी महामंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ वालवणे यांनी केले आहे.