पंचवटी : कॉलेजला जाणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना दुचाकी आडवी मारून त्यांना शस्त्राचा धाक दाखवत खिशातील मोबाइल तसेच रोकड रकमेची जबरदस्तीने लूट करून नेणाऱ्या संशयित आरोपीना आडगाव पोलिसांनी बेड्य ठोकल्या. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोबाइल व रोकड असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी दिली आहे.
तपोवन वॉटर प्लांट येथून दहा दिवसांपूर्वी कॉलेजला पायी चालत जाणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना भररस्त्यात दुचाकी आडवी मारून धारदार कोयत्याच्या धाक दाखवून जबरदस्तीने दोन मोबाइल तसेच अकराशे रुपयांची रोकड लुटून नेली होती. या घटनेनंतर आडगाव पोलिसांनी गुन्हा शाखेच्या भास्कर वाढवणे, जगदीश जाधव, विजय सूर्यवंशी, दशरथ पागी आदींनी नाशिकरोड गोरेवाडीत राहणाऱ्या दिपक दिगंबर गायकवाड याच्यासह जेलरोड येथील अनिकेत राजू रोकडे यांच्यासह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी त्यांनी लूट केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.