नाशिक : गुलाबी रंगाचा भरजरी शालू, केसांत माळलेला गजरा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू आणि हातात पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारणाऱ्या अनन्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाभोवती सुवासिनी पूजेसाठी येतात यात नावीन्य ते काय, पण अनन्या या साºयापेक्षा वेगळी होती. फ्रान्सची हेन्रीट नाशिकची सून झाली आणि अनन्या म्हणून वटपौर्णिमा साजरी करताना तिच्याकडे लक्ष वेधले गेले नसते तरच नवल.हेन्रीट आणि आताची अनन्या. पंचवटीतील अभियंता, बांधकाम व्यावसायिक अनय काळमेख यांच्याशी लग्न करून नाशिकची सून झाली आणि गेल्या दोन वर्षांपासून काळमेख यांच्या घरात ती नांदत आहे. भारतीय संस्कृती आणि महाराष्टÑाची परंपरा याविषयी प्रचंड ओढ असलेली हेन्रीट मराठमोळे सण आवर्जून साजरा करते. गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील स्वामी समर्थ केंद्राच्या आवारात वटपौर्णिमा सणही तिने अगदी मराठमोळ्या अंदाजात साजरा केला.सुनेला पदोपदी शिकविणाºया सविता काळमेख सूनेला आवर्जून सर्व माहिती सांगतात.हैदराबादमध्ये आमची ओळख झाली आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीने आम्ही विवाहबद्ध झालो. अनन्याला सर्व सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आनंद वाटतो. ती सध्या मराठी शिकत असून, काही शब्द मराठीत बोलते.- अनय काळमेखभारतीय संस्कृतीने मला नेहमीच आकर्षित केले आहे. येथील सण, समारंभ आणि परंपरा खूपच आनंददायी आहे. या सणांचा आनंद मी नाशिकमध्ये घेत आहे. पतीसाठी वडाची पूजा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.- अनन्या (हेन्रीट) काळमेख
फॉरेनच्या सूनबाईने साजरी केली वटपौर्णिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:35 AM