जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या कोरोना व अनुषंगिक विषयाच्या संदर्भाने प्रमुख अधिकाऱ्यांच्या झालेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जे अधिकारी व कर्मचारी अतिजोखमीच्या पातळीवर काम करत आहेत, त्यांना लसीकरणात प्राधान्याने समाविष्ट करण्यात यावे. लसीकरण मोहिमेत कामाचा भार, भौगोलिक परिस्थिती यांचा विचार करून विविध स्तरांवर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची पर्यवेक्षण टीम्स तयार करण्यात याव्यात. लसीकरण कार्यक्रमात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही सहभाग होण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. लसीकरणाचे लाभार्थ्यांना लाभ देण्यापूर्वी त्यांच्या ॲलर्जी व प्रतिकारक्षमतेचा वैद्यकीय इतिहास संकलित करण्यात यावा. लसीकरणानंतर होणारा जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाटीच्याही उपाययोजना कराव्यात. लसीकरणासाठी तीन रूम निश्चित करण्यात याव्यात, तसेच आवश्यकतेनुसार व्हॅक्सिन कॅरिअर खरेदीच्याही सूचना यावेळी डॉ.म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. नोव्हेंबर, २०२० नंतर भारतात परतलेल्या प्रवाशांचे व त्यांच्या निकटतम सहवासितांचा त्वरित शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यात यावी, तसेच त्यांचा भारतात आलेल्या दिवसापासून पुढे २८ दिवस पाठपुरावा करण्यात यावा. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासितांचे त्वरित ट्रेसिंग व टेस्टिंग करून घेण्यात यावे. आवश्यकतेनुसार संशयित रुग्णांना संदर्भसेवा उपलब्ध करून देण्यात यावी, असेही त्यांनी संगितले.
यावेळी जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या आजपर्यंतच्या परिस्थितीचे प्रास्तविक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. मागील कोविड रुग्णांची गेलेली कमाल उच्चांक पातळी विचारात घेऊन, त्यानुसार जिल्ह्यामध्ये बेडची उपलब्धता ऑक्सिजनची उपलब्धता औषधांची उपलब्धता याची माहिती दिली. महानगरपालिकेबाबत आयुक्त कैलास जाधव, तर जिल्हा परिषदेबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सादर केली. कोरोना संदर्भातील वैद्यकीय सोईसुविधांबात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी आपापल्या क्षेत्रातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले.