नाशिक : राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत महापालिकेने साडेसतरा हजार रोपे लावून उद्दिष्टपूर्ती केली खरी, परंतु सदरचे काम करताना प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने पंचवटीत परस्पर अडीचशे विदेशी प्रजातीची काशिदाची झाडे लावल्याने धावपळ उडाली. उद्यान विभागाने तातडीने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून, देशी प्रजाती झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा देयक अदा केले जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वतीने यंदाच्या वनमहोत्सवात १३ कोटी झाडे लावण्याचे ठरविण्यात आले होते. त्यात नाशिक महापालिकेला १२ हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट नगरविकास विभागाने दिले होते. महापालिकेने त्यासाठी निसर्ग लॅँड स्केप या कंपनीला कंत्राट दिले असून १ महिन्याच्या आत इतकी रोपे लावून त्याची देखभाल व दुरुस्ती अठरा महिने करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र २८ जुलै रोजी संबंधित ठेकेदाराने परस्पर सर्व्हे नंबर २५७ व २५९ म्हसोबावाडी येथे सुमारे अडीचशे विदेशी काशिदाची झाडे लावली होती. विशेष म्हणजे ठेकेदाराशी महापालिकेने केलेल्या करारांत काशिद प्रजातीच्या झाडांचा समावेश नाही. इतर प्रजातीची वृक्षलागवडीसाठी परस्पर लागवड करण्यास येऊ नये, असे समक्ष सांगितले असतानाही परस्पर रोपे लावण्यात आल्याने सदरची करारानुसार वृक्षलागवड करावी तसेच रोपांची गुणवत्ता तपासून स्पेसिफिकेशनप्रमाणेच वृक्षलागवड करावी अन्यथा परस्पर वृक्षलागवड केल्यास त्याचे देयक देता येणार नाही. अन्यथा या कामात कुठल्याही प्रकारचे स्वारस्य नसल्याचे गृहीत धरून कार्यवाही करण्यात येईल, असे उद्यान अधीक्षकांनी बजावलेल्या नोटिसीत म्हटले आहे. कंत्राटी पध्दतीने रोपे लावण्यास मुळातच स्थायी समितीत विरोध झाला होता. परंतु त्यानंतरही हा ठराव मंजूर करून प्रशासनाकडे पाठविण्यात आला आणि त्यानंतर शासनाच्या वनमहोत्सवाअंतर्गत घाईघाईने ठेकेदारास कंत्राट देऊन कामकाज सुरू करण्यात आले त्यात हा प्रकार घडला.
विदेशी वृक्षप्रेम ठेकेदाराला भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 1:01 AM