वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 01:13 AM2020-10-24T01:13:48+5:302020-10-24T01:14:22+5:30
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (दि २३) रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते.
नाशिक- काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (दि २३) रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते.
मूत्रपिंड विकारामुळे डायलिसिस सुरू असताना त्यांना त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
नाशिकच्या राजकारणपलीकडे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात वावर असलेले विनायकदादा हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात. पुलोद मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केले होते.शेती आणि वन चळवळ रुजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अलीकडे राजकारणापासून दूर असले तरी सर्वच पक्षांशी त्यांचे चांगले संबंध होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद यासह अनेक संस्थावर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी कृषी क्षेत्रातील त्यांची रुचि बघून त्यांना वनाधिपती ही उपाधी दिली होती. भाजपचे जेष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांचे ते बंधू होत. त्यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या पश्चात 2 कन्या आहे.