येवला : शासकीय पातळीवर वृक्ष व जल संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात असले तरी लोकसहभागातूनच वनसंवर्धन व जलसंवर्धन शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. गौतम कोलते यांनी केले.
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘जागतिक वन दिवस’ व ‘जागतिक जल दिन’ संयुक्तपणे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ‘वृक्ष व जल संवर्धन काळाची गरज’ या विषयावर प्रा. डॉ. गौतम कोलते यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. वनांच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ऱ्हासामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उभे राहिले आहे, निसर्गातील जैवविविधता धोक्यात आली आहे. एकूणच निसर्गाचा समतोल बिघडला आहे. हवामान बदलावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. पशू-पक्ष्यांचे निवासस्थान नष्ट झाल्याने वन्य प्राणी मानवी वस्त्यांमध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूणच पृथ्वीच्या विनाशाकडे आपण जात आहोत. हे सर्व थांबवायचे असेल तर वनसंवर्धन केलेच पाहिजे, प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, ते जगवावे असे आवाहन करून, लोकसहभागाशिवाय वनसंवर्धनाची मोहीम यशस्वी होऊ शकत नाही, असेही डॉ. कोलते म्हणाले. कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. अरुण वनारसे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. विलास खैरनार, प्रल्हाद जाधव, सोमनाथ कुवर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. कैलास बच्छाव यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले. आभार प्रा. टी. एस. सांगळे यांनी मानले.
---------------------
येवला महाविद्यालयात ‘जागतिक वन दिवस’ व ‘जागतिक जल दिन’ संयुक्त कार्यक्रमप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. गौतम कोलते. मंचावर प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, प्रा. अरुण वनारसे व डॉ. धनराज धनगर. (२२ येवला २)
===Photopath===
220321\22nsk_33_22032021_13.jpg
===Caption===
२२ येवला २