कळवाडी : परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. कळवाडी शिवारात पाडळदे रस्त्यालगत शेतात बिबट्या दबा धरून बसला होता. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने गेल्या काही दिवसांपासून पिंजरा लावला होता. त्यात तो अडकल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पाडळदे रस्त्याला शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार बिबट्यााने दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली होती. काही शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता. कुत्रे, शेळ्या आणि जनावरे बिबट्याने फस्त केली होती. शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत होती. त्यामुळे रात्री कुणी शेतात जात नसे. वारंवार वनविभागाला कळविण्यात आले होते. पाच दिवसांपूर्वी संजय चिंतामण खैरनार यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. त्यात बिबट्याला जेरबंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी वनविभागाचे अधिकारी कांबळे, वनरक्षक सागर पाटील, वनपाल देवरे, बापू जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कळवाडी परिसरात बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 5:07 PM