कळवण : लॉकडाउनमुळे भाविक-पर्यटकांना सप्तशृंग गडावर येण्यास बंदी असल्याचा परिणाम गडावरील व्यावसायिकांवर तर झालाच, पण मुक्तसंचार करणाऱ्या मुक्या वन्यजिवांना कमालीचा फटका बसला. त्यांचे दाणापाणीच बंद झाल्याने त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना वनविभागाने तातडीने हालचाल करून त्यांचा हा प्रश्न सोडविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.गडावर येणाºया भाविकांच्या आधारावर आपले उदरभरण करणाºया वन्यजिवांवर उपासमारीची वेळ आली असताना कळवणच्या संवेदनशील वन अधिकारी-कर्मचा-यांनी या मुक्या प्राण्यांसाठी खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था केली आहे.सहायक वनसंरक्षक मोरे आणि कळवण वनपरिक्षेत्र अधिकारी वसंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल योगीराज निकम, पंकज देवरे, खडकसिंग पाल आणि अमृतराव पवार या वनकर्मचाऱ्यांनी रोज भर उन्हात गडावरील शेकडो माकडांसह अन्य पशु-पक्ष्यांसाठी जागोजागी फळफळावळ, कुरमुरे, फुटाणे व अन्य खाद्य पदार्थ ठेवण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोयदेखील केली आहे.
वनविभाग भागवतोय वन्यजिवांची तहानभूक..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 9:24 PM