नाशिक : शहरातील विनयनगर भागातील ‘एंजेल’ नावाच्या पक्षी, प्राणी, मासेविक्रीच्या दुकानामध्ये नाशिक पश्चिम वनविभागाने छापा मारून वन्यजीव अनुसुची-४मधील दोन भारतीय तारा कासव आणि ४३ भारतीय पोपट मंगळवारी (दि.२०) जप्त केले. दुकानमालक मझहर इस्माईल खान यास वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पक्ष्यांमध्ये भारतीय पोपट आणि वन्यजिवांमध्ये तारा कासव हे दोन्हीही सध्या संकटस्थितीत सापडले असून, त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी, अनुसुची-१मधील कासवाची प्रजाती दुकानदाराने ठेवल्याची गुप्त माहिती वनविभाग पश्चिम नाशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांना मिळाली. त्यानुसार भोगे यांनी साध्या वेशातील एक पथक व त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांच्या नेतृत्वाखाली गणवेशातील दुसरे पथक तयार करून विनयनगर भागात दुपारी सापळा रचला. येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या परिसरात एंजेल दुकानात साध्या वेशातील पथकामधील कर्मचारी खासगी वाहनाने बनावट ग्राहक बनून दाखल झाले. यावेळी दुकानदाराकडे कासव असल्याची खात्री पटल्यानंतर बनावट ग्राहकाने तत्काळ पथकाला माहिती कळविली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास गणवेशातील पथकही दुकानाबाहेर येऊन धडकले. पथकाने तत्काळ संशयित खान यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने कासव काढून दिले. हे कासव मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नसल्याची खात्री पटली; मात्र अनुसूची-४मध्ये भारतीय तारा कासवचा समावेश असल्याचे लक्षात येताच पथकाने ते जप्त केले. पथकाने त्याची कसून चौकशी केली असता त्याने जुने नाशिकमधील कथडा भागातील त्याच्या राहत्या घरात भारतीय वन्यजीव कायदा अनुसूची-४मधील वर्ग ४३ भारतीय पोपट दडवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार भोगे यांनी वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे, जे. बी. पंढरे यांच्या पथकासह खानच्या घरावर छापा मारला. यावेळी त्याच्या घरातून तीन पिंजऱ्यांमध्ये बंदिस्त ठेवलेले ४३ भारतीय पोपट हस्तगत केले. याप्रकरणी पुढील तपास वनविभागाकडून केला जात आहे.
वनविभागाकडून दोन तारा कासव अन् ४३ पोपट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 10:21 PM
एंजेल दुकानात साध्या वेशातील पथकामधील कर्मचारी खासगी वाहनाने बनावट ग्राहक बनून दाखल झाले. यावेळी दुकानदाराकडे कासव असल्याची खात्री पटल्यानंतर बनावट ग्राहकाने तत्काळ पथकाला माहिती कळविली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास गणवेशातील पथकही दुकानाबाहेर येऊन धडकले.
ठळक मुद्देभारतीय पोपट, तारा कासव हे दोन्हीही सध्या संकटस्थितीत तीन पिंजऱ्यांमध्ये बंदिस्त ठेवलेले ४३ भारतीय पोपट हस्तगत