सातपूर : शालेय विद्यार्थ्यांना दुर्बिण व टेलिस्कोपद्वारे गिधाड पक्षी निरीक्षणाची संधी उपलब्ध करून देत वनविभागाच्या वतीने जागतिक गिधाड जागरूकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी परिसरात शालेय विद्यार्थ्यांमध्ये गिधाड या पक्षाविषयी जागरूकता निर्माण करून प्रबोधन करण्यासाठी वनविभाग आणि नेचर कन्झर्वेशन सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गिधाड हा स्वच्छतेचे काम प्रभावीपणे पार पाडणारा निसर्ग अन्न साखळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण पक्षी आहे. निसर्गचक्रात मृत पावलेल्या प्राण्यांची विल्हेवाट लावणे, कुजलेले मांस खाणे हे गिधाडाचे काम आहे. नाशिक जिल्ह्यात इजिप्शियन, भारतीय लांबी चोचीचे गिधाड, पांढऱ्या पुढ्याचे गिधाड आदि प्रकारची गिधाडे आढळतात. भारतात गिधाडांची संख्या ९७ टक्क्यांनी कमी झालेली आहे. सदर गिधाड पक्षांना वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ मधील अनुसूची ४ मधून अनुसूची १ मध्ये समाविष्ट करून त्यास कायदेशीररीत्या संरक्षण प्राप्त करून दिलेले आहे, अशी माहिती उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना दुर्बिण व टेलिस्कोपद्वारे गिधाड पक्षी निरीक्षणाची संधी या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील, उपवनसंरक्षक अनिता पाटील, वनसंरक्षक पी. पी. भामरे, एस. जी. वावरे, ए. जी. चव्हाणके, प्रशांत खैरनार, आर. जी. वाघ, सी. एस. गोसावी, ए. एस. निंबेकर, श्रीमती आर. आर. सानप, एन. के. अहिरे, के. व्ही. अहिरे, नेचर सोसायटीचे अध्यक्ष विश्वरूप राहा, भुरे, आगासे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
वनविभागाचा उपक्रम;गिधाड निरीक्षण मोहीम
By admin | Published: September 09, 2015 11:59 PM