नाशिक : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाने लागवड केलेल्या दहा हेक्टरवरील क्षेत्रात मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारणे केल्याने या ठिकाणी आगीचे तांडव सुरू झाले. लागवड क्षेत्रातील सुमारे वीस हजार झाडे जळून खाक झाली.
दातली- खंबाळे दरम्यान वनविभागाचे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या पावसाळ्यात यापैकी २५ हेक्टर जागेत वृक्षरोपण करण्यात आले आहे. या झाडांची वाढ देखील चांगली झाली आहे. मंगळवारी अचानकपणे मध्यरात्री लागलेल्या आगीत लागवड केलेली सुमारे 20 हजार झाडे जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप निश्चित होऊ शकलेले नाही.सिन्नर तालुक्यात वनविभागाचे सर्वाधिक क्षेत्र खंबाळेत आहे. या क्षेत्रात चराईबंदी, कु-हाडबंदी करण्यात आली आहे. आग लागल्याचा प्रकार बघितल्यावर शेतकरी चिंतामण आंधळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी दाखल होण्याअगोदरच आंधळे यांनी त्यांच्याकडे कामाला असलेल्या मजुरांना घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. काही वेळेतच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल अनिल साळवे हे वनरक्षक, वनमजुरांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी आगीने भीषण स्वरूप दाखल केलेले होते. अचानक लागलेली आग आटोक्यात आटोक्यात आणताना वनरक्षक, वनमजूरांना युध्दपातळीवर प्रयत्न करावे लागले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.--रानगवताची हानी झाली आहे. जाळपट्टा घेतला असल्यामुळे रोपे काही प्रमाणात भाजली आहे. काही दिवसानंतर येथील रोपांना पुन्हा पालवी फुटेल रोपे जळून राख झालेली नाही, त्यामुळे जास्त भीती नाही. याप्रकरणाचा तपास सुरू आहे, आग कशी लागली याचा शोध घेतला जात असून दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल.- प्रवीण सोनवणे, वनक्षेत्रपाल, सिन्नर वनपरिक्षेत्र