पेठ - वनविभागाच्यावतीने दरवर्षी मोठा गाजावाजा करून कोटीच्या कोटी झाडे लावली जातात. मात्र या कामासाठी ज्या वनमजूरांना राबवण्यात येते त्यांच्या वेतनाची स्थिती अतिशय गंभीर असून जानेवारी पासून हजारो वनमजूरांचे वेतन अदा झाले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. किमान वेतन अधिनियम १९४८ अन्वये अस्थापनेतील कामगार हा वन व वनशास्त्र विषयक रोजगारात गृहीत धरला जातो. अशा कामगारास दर सहा महिन्यांनी किमान वेतन दरात वाढ देणे अपेक्षित असतांना वन कामगार या वाढीपासून व मिळणाऱ्या फरकापासून वंचित आहेत. शिवाय वन विभागाने लावलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे सर्व प्रकारची बिले अदा झाली असतांना केवळ वन कामगारांना ११ महिण्यापासून वेतन अदा करण्यात आले नसल्याने कुंटूबाचा चरितार्थ कसा भागवावा या विवंचनेत वनमजूर सापडले आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने राज्यभर वन कामगारात असंतोष पसरला आहे.---------------राज्यातील जवळपास ३३३९ वन कामगारांचा कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय अजूनही प्रलंबित असून तुटपूंज्या वेतनावर काम करणाºया वनकामगारांना जानेवारीपासून वेतन अदा करण्यात आलेले नाही. बहुतांश वन कामगार हे अतिशय हलाखीत आपला संसार चालवत असल्याने तात्काळ वेतन अदा न झाल्यास नागपूर विधीमंडळ अधिवेशनस्थळी उपोषण करण्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.-भाऊसाहेब शिंदे, उपाध्यक्ष, वन कामगार कृती समतिी नाशिक
वन कामगारांचे वेतन ११ महिन्यांपासून लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 2:21 PM