नाशिकरोड : देवळालीगाव रोकडोबावाडी डोबी मळ्यात असलेला बिबट्याचा वावर व वन विभागाचा खराब नादुरूस्त पिंजऱ्यामुळे रहिवासी भीतीच्या छायेत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच वन विभागाने तत्काळ नवीन पिंजरा डोबी मळ्यात बसविला आहे. डोबी मळ्यात गेल्या एक-दीड महिन्यापासून बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी, मजुर, महिला शेतात काम करण्यास धजावत नसून भीतीपोटी जीवन जगत असल्याचे सचित्र वृत्त लोकमतमध्ये (दि.३१) प्रसिद्ध झाले होते. डोबी मळ्यात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजºयाच्या खालील भागाचा पत्रा फाटल्याने शेतातुन पिंजरा काढुन ठेवला होता. आठ दिवसांपूर्वीच विजय बुवा यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ बांधलेल्या बोकड्याचा बिबट्याने फडशा पाडला होता.भरदिवसा उसाच्या व इतर शेतात तसेच झाडावर बसलेल्या बिबट्याचे दर्शन शेतकरी, मजुर, रहिवाशांना झाल्याने कोणीच शेतात काम करण्यास धजावत नाही. लहान मुलामुलींना शेतात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. रात्री मळ्यातील शेतात व घराजवळ बिबट्या येऊन गेल्याचे त्याच्या पायाच्या ठशावरून सकाळी रहिवाशांच्या लक्षात येत आहे. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेला नादुरूस्त पिंजरा बाहेर आणुन ठेवला होता.
डोबी मळ्यात वनविभागाने लावला पिंजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:19 PM