अझहर शेख : नाशिकगावपातळीवरील वनसंवर्धन व वनसंरक्षण स्थानिक गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय अशक्य आहे. सदर बाब लक्षात घेऊन वन विभागाकडून वनविकासाबरोबरच जैवविविधता जोपासण्यासाठी नाशिक पूर्व व पश्चिम विभागातील एकूण १४ तालुक्यांमध्ये सुमारे सातशे संयुक्त वनव्यवस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत लोकसहभागातून वन व वन्यजीव संवर्धन केले जात आहे. नाशिक जिल्ह्याला नैसर्गिक वरदान लाभलेले असून, शहरासह जिल्ह्यांमधील विविध तालुक्यांत वने व वन्यजीवांचे प्रमाण चांगले असून, त्यांच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून लोकसहभाग वाढविला जात आहे. यासाठी पूर्व व पश्चिम विभागाच्या हद्दीमधील तालुक्यातील गावे, आदिवासी पाड्यांवरील रहिवाशांना विश्वासात घेऊन संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची रचना करून त्या माध्यमातून त्या परिसरातील वनजमिनीवर वृक्षलागवड व संवर्धन तसेच वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्यावर वनविभाग भर देत आहेत. नाशिक पूर्व विभागात एकूण ३२० तर पश्चिम विभागाच्या हद्दीत एकूण ३९४ गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन करून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी जंगल संरक्षणासह जंगलवाढीसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. वन विभागाने जिल्ह्यातील विविध गावांमधील वनजमिनींवर २००५ सालानंतर करण्यात आलेले अतिक्रमण काढून त्या जागेवर रोपवन योजनेंतर्गत वनीकरण करून वृक्षसंवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या समित्यांमार्फत लोकसहभागातून वन विकासाची विविध कामे गावपातळीवर केली जात आहे. वननिर्मितीसाठी वृक्षलागवड व संवर्धन, डोंगरउतारावरून वाहणारे पावसाचे पाणी अडविणे, समपातळीवर चर खोदणे यांसारख्या उपाययोजना करत वनवाढीसाठी पूरक ठरणारे मृदा व जलसंधारणाची कामे केली जात आहे.
जिल्ह्यात ७०० गावांत वनसंवर्धन
By admin | Published: March 21, 2017 12:45 AM