नाशिक : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय शिक्षण मंडळाकडून होऊ घातलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा तणावणुक्त, कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी गेल्यावर्षी शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या विद्यार्थी समुपदेशन उपक्रमाचा यंत्रणेला यावर्षी विसर पडला असून, या उपक्रमाचे डिसेंबर महिना सुरू होऊनही अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन झालेले नाही. त्याचप्रमाणे कलचाचणी परीक्षा उपक्रमाचाही यंत्रणेला विसर पडला असून, या परीक्षेसंदर्भातही कोणतेही नियोजन झालेले नसून नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला यांसदर्भात अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाहीतणावमुक्त परीक्षा अभियानांतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येते. त्यासाठी गेल्यावर्षी नाशिक विभागात तालुकास्तरावर सुमारे २९ तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती करून करण्यात आली होती. नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन वर्गांचे नियोजन केले होते. त्यानुसार नाशिकमध्ये १५, जळगावमध्ये ७, धुळ्यात ५, नंदुरबारमध्ये २ समुपदेशकांनी तालुकास्तरावर १५ फेब्रवारीपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परंतु, हा उपक्रम राबविण्यात विलंब झाल्याने यावर्षी समुपदेशक नेमणूक आणि समुपदेशन वर्गांचे नियोजन डिसेंबरपासूनच सुरू होणे अपेक्षित असताना अद्याप कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, नाशिक विभागीय शिक्षण मंडळ व प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी समुपदेशन कार्यक्रमासाठी समन्वयकांची जबाबदारी सोपविलेल्या शिक्षकांच्या शाळेवर बदली शिक्षकच दिला गेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित शिक्षकाला शाळेची जबाबदारी सांभाळून समुपदेशन समन्वयकाची जबाबदारी पार पाडावी लागली होती. त्यामुळे यावर्षी संबंधित शिक्षकांमध्ये यावर्षी समन्वयकाची जबाबदारी स्वीकारण्यात अनुत्सुकता दिसून येत आहे.दहावीतील विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्राची अधिक आवड आहे, याविषयीचा विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह श्यामची आई फाउंडेशन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात १८ डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत दहावीच्या १ लाख ९९ हजार ५३४ विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. याचप्रमाणे राज्यभरातही ही कलचाचणी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु, यावर्षी अद्याप विभागीय शिक्षण मंडळाला राज्यमंडळाकडून या संदर्भात कोणतीही सूचना प्राप्त झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तणावमुक्त परीक्षांसाठी समुपदेशनाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:34 PM