नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय व जिल्हा प्रशासनाकडून मास्क वापराची सक्ती करण्यात आली आहे. तरीदेखील काही महाभागांकडून मास्कच्या वापराला फाटा देत सामाजिक अंतर न राखता सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून येणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. या गुन्ह्यांवर न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यानुसार ७३ दोषी नाशिककरांना ४७ हजार ३०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यावरुन नागरिकांनी बोध घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना दाखविलेला निष्काळजीपणा हा कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २१ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. यानंतर राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल केले; मात्र कोरोनापासूुन बचावासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. साथरोग, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
सार्वजनिक ठिकाणी वावरताना सर्रासपणे उघड्यांवर थुंकणारे, मास्कविना वावरणारे आणि सामाजिक अंतराकडे कानाडोळा करणाऱ्यांविरुध्द शहर पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११५, ११७ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. एरवी पोलिसांकडूनच दंड आकारुन संबंधित व्यक्तीला सोडले जाते; मात्र साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नागरिकांना गांभीर्य लक्षात यावे, म्हणून अशा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने असा ठोठावला दंड
मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एम. राजपुत यांनी २५ व्यक्तींना प्रत्येकी ७००, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टी. एन. कादरी यांनी ३४ लोकांना प्रत्येकी ७०० रूपयांचा दंड सुनावला. तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन करणार्या १४ जणांना प्रत्येकी ४०० रूपयांचा दंड न्यायालयाकडून ठोठावण्यात आला आहे. एकूण ७३ नाशिककरांना ४७ हजार ३०० रुपये दंड भरावा लागणार आहे.