त्र्यंबकेश्वर : यंदाही कोरोनामुळे परंपरा खंडित होऊ नये यासाठी येथील संत सदगुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीचे प्रस्थान गुरुवारी (दि.२४) वट पौर्णिमेच्या दिवशी औपचारिकरीत्या समाधी संस्थानचे प्रशासकीय विश्वस्त मंडळ आणि मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. पालखी मंदिरातच मुक्कामी राहणार आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्वच पायी दिंड्यांवर गर्दी नियंत्रणासाठी बंदी घातली होती; परंतु पंढरपूर वारीची परंपरा खंडित होऊ नये यासाठी शिवशाही बसने मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. यंदाही कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्य शासनाने पायी वारीस परवानगी नाकारली असून, दोन शिवशाही बसची व्यवस्था करून दिली आहे. त्यामुळे संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला १९ जुलै राेजी रवाना होणार आहे. मात्र, परंपरेनुसार पालखीचे प्रस्थान २४ जून रोजी होणार असल्याने प्रस्थानाचा औपचारिक सोहळा कोरोनाचे नियम पाळून मंदिरातच करण्यात येणार आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांच्या हस्ते निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीची महापूजा होणार असून, सकाळी ९.४५ वा. आरती, १०.३० वाजेपर्यंत भजन, तर सकाळी १०.३० ते ११ वाजेपर्यंत पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे.
दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिंडीचे मानकरी ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज डावरे, ह.भ.प. बाळासाहेब देहूकर व महामंडलेश्वर डाॅ. रामकृष्ण महाराज लहवीतकर आदी उपस्थित राहणार आहेत.
इन्फो
१९ जुलैला पंढरपूरकडे रवाना
संस्थानचे प्रशासक के.एम. सोनवणे व ॲड. भाऊसाहेब गंभिरे, पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, ह.भ.प. योगेश महाराज गोसावी यांनी पत्रकार परिषदेत पालखी सोहळ्याच्या नियोजनाची माहिती दिली.
दि.१९ जुलै रोजी आषाढ शु.दशमीला परिवहन महामंडळाच्या दोन बसने पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. त्यात ४० मानाच्या दिंड्यांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीला स्थान मिळेल व प्रशासकीय विश्वस्त मंडळाचे सदस्य, विणेकरी, टाळकरी, झेंडेकरी, भालदार व चोपदार, पखवाज वादक, मानकरी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदी बसमध्ये स्थानापन्न होतील. यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने परिवहन महामंडळाच्या दोन बस शिवशाही बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.