नाशिक : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची भूमिका स्पष्ट केली असून, या आंदोलनाचा एल्गार
१६ जूनपासून कोल्हापूरमधून करण्यात येणार आहे. या आंदोलनात नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो आंदोलक सहभागी होणार आहेत. त्यासाठी नाशिकमधील मराठा संघटनांची मोर्चेबांधणी सुरू असून, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक कोल्हापूरच्या दिशेने रवाना होण्यासाठी नियोजन करीत आहेत.
नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे संभाजीराजे यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी कोल्हापुरातील आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा करून या आंदोलनाला बळ देण्याचा निर्धार केला आहे. किल्ले रायगडावर रविवारी (दि. ६) राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली असून, या आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरमधून होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात मराठा समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडल्या आहेत. तसेच ऑनलाइन बैठकांमधूनही याविषयी चर्चा झाली असून, कोल्हापूरच्या दिशेने रवाना होण्याविषयीच्या नियोजनासंदर्भात मंगळवारी संबंधितांना अंतिम सूचना केल्या जाणार आहेत.
इन्फो-
दुसरे मूक आंदोलन नाशकात
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात १६ जूनला आंदोलन झाल्यानंतर दुसरे मूक आंदोलन नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या या आंदोलनासाठी संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार असून, या आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात मंगळवारी शासकीय विश्रामगृहात विविध मराठा संघटना व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप आदींनी दिली आहे.