संजय पाठक, नाशिक- दिंडोरी लोकसभा मतदार संघात इच्छुक असलेले भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे बंड भाजप नेत्यांनी रोखले. अर्थात त्यानंतरही भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर हरिश्चंद्र चव्हाण यांनी काल धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या घरी जाऊन भेट घेतली तसेच त्यांचे अभिनंदन केल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
डॉ. शोभा बच्छाव यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आणि माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे. गेले दोन दिवस मतदार संघात सत्कार स्वीकारल्यानंतर काल सायंकाळी त्यांचे नाशिक मधील पेठरोड येथील निवासस्थानी आगमन झाले. त्यानंतर हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांचे अभिनंदन केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंड करण्याची तयारी केली होती मात्र भाजपाच्या नेत्यांनी विनंती केल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला.
दरम्यान, आता त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करणाऱ्या डॉ बच्छाव यांची भेट घेतल्याने ते काँग्रेसच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात लोकमतशी बोलताना डॉ. हरिश्चंद्र चव्हाण यांनी काँग्रेस प्रवेशाचा इन्कार केला. डॉ. बच्छाव आणि आपले कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे आपण त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले पक्षांतराचा कोणताही विचार नसल्याचे आणि आपण भाजपातच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.