नाशिक : राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे व विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे दोघे आजी-माजी मुख्यमंत्री रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. दोघांचेही स्वतंत्र कार्यक्रम असले तरी, दोघांचीही पहिलीच नाशिक भेट असल्याने शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय कुरघोडीसाठी शहरात जोरदार फलकबाजी करण्यात आली आहे.विधानसभेची निवडणूक एकत्र लढल्यानंतर सेना व भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदावरून झालेला बेबनाव व त्यानंतर राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घेतलेला शपथ विधी, तर दुसरीकडे सत्तास्थापनेसाठी राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांना गळाला लावून गुपचूप दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांना अवघ्या ८२ तासांत राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्रिपदावरून उतार झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांची निवड करण्यात आली. गेली २५ वर्षांपेक्षा अधिक काळ युतीत एकत्र घातल्यानंतर आता परस्परविरोधी झालेल्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर दोन्ही पक्षांचे नेते वेगवेगळ्या भूमिकेत नाशकात पहिल्यांदाच येत आहेत. रविवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहरात आगमन होत असून, दिवसभर त्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांनी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तर सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन होईल व रात्री ते शासकीय विश्रामगृहात मुक्कामी राहणार आहेत. ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ८ वाजता महाराष्टÑ पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी अधिकाºयांचा दीक्षांत समारंभ होणार आहे. या कार्यक्रमानंतर ठाकरे हे सकाळी १० वाजता ओझरहून मुंबईकडे रवाना होतील. आजी, माजी मुख्यंमत्र्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून, दोघांनीही वेळात वेळ काढून कार्यकर्ते, पदाधिकाºयांना भेटीसाठी वेळ दिली आहे. त्यामुळे या काळात शहर व जिल्ह्यातील राजकारणावर खलबते होण्याची शक्यता आहे.दोघे काय बोलणार ?राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा चांगलाच रंगत आहे. त्यातच फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्यानंतर नाशिकसाठी असलेली स्मार्ट सिटी तसेच टायर बेस्ड मेट्रो गुंडाळणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर उभय नेते काय बोलतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे.
आजी-माजी मुख्यमंत्री आज नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:59 AM