'एकत्र लढू, पण सावरकरांचा अपमान पटणार नाही'; उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 08:17 AM2023-03-27T08:17:18+5:302023-03-27T08:17:39+5:30
ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
मालेगाव (जि. नाशिक) : भारत जोडो यात्रेत आम्हीदेखील सहभागी झालो होतो. आम्ही लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत; परंतु सावरकर हे आमचे दैवत असल्याने त्यांचा अपमान कदापिही पटणार नाही, असा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मालेगाव येथील जाहीर सभेत सुनावले. याचवेळी ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.
ठाकरे म्हणाले, सावरकरांनी देशासाठी कष्ट उपसले आहेत. आम्ही सावरकर भक्त आहोत. आपण लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. राहुल गांधी यांना डिवचले जात आहे. त्यामुळे त्यांनी फाटे फुटू न देता देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याच्या लढाईला बळ द्यावे, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला.
निवडणूक आयोगावर टीका करतानाच ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटालाही लक्ष्य केले. आमचे नाव चोरले, बाण चोरला परंतु जिवाभावाची माणसं ते चोरू शकत नाहीत. मुख्यमंत्री असताना मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. परंतु आज ज्यांच्या गळ्यात घंटा बांधलेली आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री स्वत:च्या शेतावर रमतात परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर जायला त्यांना वेळ नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
बावन्न कुळे खाली उतरली तरी...
ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्यावरही टीका केली. ठाकरेंपासून शिवसेनेला कुणीही तोडू शकत नाही. त्यांची ५२ कुळे खाली उतरली तरी ते शक्य नाही. येणारी निवडणूक भाजप मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली लढविणार काय, असा सवालही ठाकरे यांनी केला.