नाशिक - रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी अनेक नागरिक नवस बोलतात किंवा पूजा विधी करतात. देवस्थानाला भेटी देतात. मात्र, नाशिक शहरातील महापालिकेच्या स्टेडियमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी येथील एका माजी नगरसेविकेने स्टेडियम परिसरात पूजाविधी केला. एवढेच नाही, तर यानंतर त्यांच्या पतीने चक्क बोकडाचा बळी दिल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे संबंधित माजी नगरसेविकेनी त्याचे समर्थनही केले आहे.
नाशिक शहरातील सिडको भागात अश्विन नगर येथे महापालिकेचे राजे संभाजी क्रीडा संकुल आहे. या स्टेडियमच्या आवारात विविध विकास कामे करण्यात येणार असून त्यासाठी दोन कोटी 93 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र अनेक महिन्यांपासून हे काम वेगवेगळ्या कारणांसाठी रखडले आहे. त्यामुळे कधी ठेकेदार नाही तर कधी निधी अपूर्ण मिळतो. त्यामुळे आता हे काम निर्विघ्नपणे पार पाडावे यासाठी या परिसराच्या माजी नगरसेविका किरण दराडे गामणे यांनी स्टेडियम परिसरात पूजा विधी केला. तर त्यांचे पती बाळा दराडे यांनी चक्क बोकड बळी दिला.
दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकाराचा निषेध केला आहे. नवसापोटी बोकड बळी देणे ही अंधश्रद्धा आहे. शासकीय काम हे नियमानुसारच झाले पाहिजे मात्र त्यासाठी अशा प्रकारे समाजात अंधश्रद्धा वाढीस लावणे, हे कृत्य चुकीचे असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.