नाशिक : राजकीय पक्ष तसेच आजी-माजी नगरसेवकांची उत्कंठा लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अखेरीस महिला आरक्षणाची सोडत निघाली असून, त्यामुळे नुकतेच माजी झालेल्या आणि पुन्हा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या अनेकांची कोंडी झाली आहे. घरातील महिलांना पुढे करून त्यांना लेडीज फस्ट म्हणण्याची वेळ आली आहे. यात स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, गट नेते अरुण पवार, राहुल आणि प्रशांत दिवे यांच्यासह अन्य नगरसेवकांचा समावेश आहे.
महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात ६७ महिलांना आरक्षणात स्थान मिळाल्याने अनेक प्रभागांत माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांची अडचण झाली आहे. अर्थात प्रस्थापितांची अडचण झाली असली तरी प्रत्यक्षात नवीन महिलांना संधी मिळणार आहे. दुसरीकडे माजी नगरसेवक सुरेश खेताडे, पूनम धनगर, भगवान व राकेश दोंदे आनंदवली येथील संतोष गायकवाड यांचीही आरक्षणामुळे अडचण झाली आहे, असे सांगण्यात येत असून, त्यांना पर्याय शोधावा लागणार आहे.
नाशिक महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. नाशिक शहराचे ४३ तीन सदस्यीय तर एक चार सदस्यीय असे एकूण ४४ प्रभाग असून, एकूण १३३ जागा आहेत. त्यात ६७ जागा महिलांसाठी अनुसूचित जातीच्या १९ जागांपैकी दहा महिलांसाठी तर अनुसूचित जमातीच्या १० पैकी ५ जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. त्याची सर्वप्रथम सोडत काढण्यात आली. त्यानंतर उर्वरित जागांसाठी शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत काढण्यात आली.
काय झाले? कोण आले अडचणीत..
- प्रभाग क्रमांक १ मध्ये तीन जागांपैकी एक जागा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहेच; परंतु त्याचबरोबर सर्वसाधारण महिला असेही आरक्षण असून, पुरुषांसाठी एकच खुली जागा असल्याने भाजपचे माजी गटनेते अरुण पवार आणि स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांना तडजोड करावी लागेल.
- प्रभाग क्रमांक क्रमांक ५ मध्ये दोन जागांवर महिला आणि पुरुषांसाठी एकच जागा खुली असल्याने जगदीश पाटील आणि रुची कुंभारकर यांना तडजोड करावी लागेल.
- शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे आणि राहुल दिवे यांच्या प्रभागात अनुसूचित जातीसाठी महिला असे आरक्षण निघाल्याने त्यांनाही घरातील महिलांचा अथवा कार्यकर्ती महिलांचा विचार करावा लागेल.
- आनंदवली भागातील शिवसेना नगरसेवक संताेष गायकवाड यांना प्रभाग ११ मध्ये कोंडी झाल्याने प्रभाग १० मध्ये स्थलांतरित व्हावे लागणार आहे.
- नाशिकरोड प्रभागाचे माजी सभापती प्रशांत दिवे यांच्या प्रभागात अनुसूचित जाती महिला आरक्षण असल्याने त्यांची अडचण असून, त्यांना सर्वसाधारण गटातून लढावे लागेल. राहुल दिवे यांच्या प्रभागातही असेच आरक्षण असले तरी दोन वेळा ते सर्वसाधारण गटातून निवडून आले आहेत.
- भाजपचे माजी नगरसेवक राकेश दोंदे व शिवसेनेचे माजी नगरसेवक उत्तम दोंदे हे प्रभाग क्रमांक ३४, ३५ व ३६ या तिन्ही प्रभागांतून इच्छुक होते, आरक्षणामुळे त्यांचीही कोंडी झाली आहे.
- सातपूरमध्ये भाजपाचे रवींद्र धिवरे आणि मनसेचे योगेश शेवरे यांनाही आरक्षणाचा फटका बसला आहे. तर प्रभाग क्रमांक ११ मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण नसल्याने नयना गांगुर्डे यांचीही काहीशी अडचण झाली आहे.
हे झाले सेफ...
माजी महापौर रंजना भानसी, माजी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, शिवसेनेचे माजी गटनेते विलास शिंदे, काँग्रेसचे माजी गटनेते शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, गजानन शेलार, ॲड. वैशाली भोसले.
हे प्रारूप १३ जून रोजी अंतिम प्रभाग रचना
महिला आरक्षणाचे प्रारूप १ जून रोजी घोषित करण्यात आले असून, ६ जूनपर्यंत हरकती आणि सूचना सादर करता येतील, त्यावर विचार करून अंतिम प्रभाग रचना १३ जून रोजी घोषित करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी जाहीर केले आहे.