नाशिक : प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीनंतर महापालिका निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती आता सुरू झाली असून, माजी महापौरांच्या सुपुत्रांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवित आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, एकाच घरात दोन किंवा तिघांना उमेदवारी देण्यास विरोधाचा सूर प्रामुख्याने सेना-भाजपातून उमटत आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांची उमेदवारी वाटपात मोठी कसोटी लागणार आहे.प्रभागरचना व आरक्षण सोडतीमुळे प्रभागाचे चित्र स्पष्ट झाले आहे. चार सदस्यांचा प्रभाग असल्याने प्रत्येक पक्षात इच्छुकांनी आपली चौघांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यातच काही माजी महापौरांच्या सुपुत्रांना पुन्हा महापालिकेत जाण्याचे वेध लागले आहेत तर काही माजी महापौरांचे सुपुत्र प्रथमच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात उतरण्याची तयारी करत आहेत. माजी महापौर अशोक दिवे यांचे सुपुत्र व विद्यमान नगरसेवक राहुल दिवे यांनी पुन्हा दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी चालविली आहे तर दिवे यांचे दुसरे सुपुत्र प्रशांत दिवे हेदेखील उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत. माजी महापौर व माजी आमदार स्व. उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र व मनसेचे शहरप्रमुख राहुल ढिकले हे पुन्हा एकदा निवडणूक लढविणार आहेत. त्यांनीही पॅनलची चाचपणी चालविली आहे. माजी महापौर प्रकाश मते यांचे सुपुत्र विक्रांत मते हेसुद्धा दुसऱ्यांदा नशीब आजमावण्यास उत्सुक आहेत. माजी महापौर दशरथ पाटील यांचे सुपुत्र प्रेम पाटील यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी चालविली असून, प्रभाग नऊमधून त्यांच्या उमेदवारीची घोषणाही करण्यात आली. पक्ष मात्र अद्याप ठरायचा आहे. माजी महापौर व विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र हेसुद्धा महापालिकेत जाण्यास उत्सुक आहेत. माजी महापौर व शिवसेनेचे नेते विनायक पांडे यांनीही त्यांचे सुपुत्र ऋतुराज यांना नगरसेवकपदी निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. माजी महापौर व माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी चालविली आहे. तब्बल सात माजी महापौरांची पुढची पिढी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने संबंधित प्रभागातील लढती या लक्षवेधी ठरणार आहेत. (प्रतिनिधी)आमदारांच्या वारसांना वेधमहापालिकेत चालू पंचवार्षिक काळात पाच नगरसेवक हे विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य आहेत. बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल अहेर व अपूर्व हिरे हे सर्व भाजपाचे आमदार आहेत. हे पाचही आमदार आता महापालिकेत दिसणार नाहीत, परंतु त्यांनी आपल्या वारसांना पुढे आणण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे पाचही आमदार आपला वारसदार कोणाला नेमतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून असणार आहे.
माजी महापौरपुत्र उतरणार रिंगणात
By admin | Published: October 27, 2016 12:54 AM